दीपावली
अंधारावर प्रकाशाचा, वाईट गोष्टींवर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक म्हणून दिवाळी या सणाला ओळखले जाते.
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य ,समृद्धी लाभो,
बाशिमवासियांना....
दिवाळीमध्ये महत्त्व असते ते आकाशकंदील ,किल्ला आणि पणत्यांचे. इयत्ता पहिली व दुसरीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या सणानिमित्त शुभेच्छा भेटकार्ड बनविले तसेच पणत्यांवर आकर्षक अशी रंगांची उधळण केली. त्याचप्रमाणे इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांची आकाशकंदील बनवण्याची कार्यशाळा शनिवार दि. ०४/१०/२०२५ रोजी घेण्यात आली. आपल्या ताई, दादांप्रमाणेच शिशु शाळेतील विद्यार्थ्यांनीदेखील आपल्या चिमुकल्या हातांनी पणत्या रंगवून, आकाशकंदील बनविले. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या सुंदर ,सुबक आकाशकंदिलांनी तसेच रंगीबेरंगी पणत्यांनी शाळेची सजावट करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी बनविलेले शुभेच्छा भेटकार्ड , रंगीबेरंगी पणत्या , आकाश कंदील शाळेस भेट देणाऱ्या अतिथींना आवर्जून दे७ण्यात आले. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक व पालकांच्या मदतीने पर्यावरणपूरक किल्ले बनविले. पर्यावरणपूरक किल्ल्यांचे उद्घाटन मंगळवार दि. ०७/१०/२०२५ रोजी इतिहास अभ्यासक मा.बापूराव अंकुश मोरे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांचे वाचन करावे ,आपले वाचन वाढवावे असा संदेश प्रमुख अतिथींनी दिला.
शाळेच्या अंगणी बसूनी,
आकाशकंदील बनविले मिळूनी,
बालचमुंच्या हातांनी ,
सजल्या पणत्या विविध रंगांनी,
शिवनेरी, सिंधुदुर्गची ख्याती मोठी,
*विद्यार्थ्यांनी साकारली त्याची प्रतिकृती,
अवघे जमले बालशिक्षण मंदिरी,
प्रमुख अतिथी कौतुक करी.
दिवाळीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ. खेडलेकर बाईंनी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच शाळेचे हितचिंतक यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
बालदिन
मोठं मन लहान शरीर,
हसणे हसवणे यात खंबीर, परमेश्वराची सावली आहेत हे बालवीर.
लहान मुले म्हणजे गुलाबाची फुले असे आपण म्हणतो. फुले आणि लहान मुले आवडणारे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणजे पंडीत जवाहरलाल नेहरू. मुलांच्या शिक्षणावर आणि कल्याणावर भर देणारे तसेच मुलांवरील प्रेमासाठी ओळखले जाणारे चाचा नेहरू.
चाचा नेहरूंचा आदर ,सन्मान करण्यासाठी त्यांच्या जन्मदिनी म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी शाळेत मोठ्या उत्साहात, आनंदात बालकांसाठी विशेष असणारा बालदिन साजरा करण्यात आला.
शाळेत बाल दिनाची सुरुवात बालवाडी ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी बालगीतांच्या श्रवणाने करण्यात आली. बालवाडीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आज पालक कार्यशाळा घेण्यात आली . शाळेत पाल्यांनी आपल्या पालकांबरोबर डबा खाल्ला.
इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी फुलपाखरू, डोरेमॉन यासारख्या चित्रांचे विद्यार्थ्यांकडून रंगभरण करून घेण्यात आले. त्याचप्रमाणे इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या माजी विद्यार्थिनी चित्रकार धनश्री केळकर यांनी *चित्ररंगवा या अंतर्गत बाल दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या चित्राचे रंगभरण स्वतः मार्गदर्शनाद्वारे करून घेतले.
बाल चिमुकल्यांसाठी शाळेत कागदी कपांचा मनोरा रचने, चेहऱ्याचे मुखवटे बनविणे, बाहुली बनविणे,विदूषकाला खडे चारणे इत्यादी अनेक मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. बम बम बोले या गाण्यावर विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्राणी ,पक्षांचे मुखवटे लावून अभिनय सादर करण्याचा आनंद लुटला. उत्कृष्ट रंगभरण, खेळातील कौशल्याबद्दल विद्यार्थ्यांचे या विशेषदिनी विशेष कौतुक करून मुलांचे लाडके चाचा नेहरू यांच्या प्रति आदर व्यक्त करण्यात आला.
शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉ. भक्ती दातार यांनी विद्यार्थ्यांना दातांचे आरोग्य या विषयावर ॲनिमेटेड फिल्मचा स्वतः तयार केलेला व्हिडिओ दाखवून मार्गदर्शन केले. शाळेच्या मा.मुख्या. खेडलेकरबाई यांनी विद्यार्थ्यांना बाल दिनानिमित्त शुभेच्छारुपी आशीर्वाद दिले.
शाळेतील शिक्षिका सौ. मंजुश्री गायकवाड यांनी बालवाडी ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.
मनाची निरागसता, हृदयाची कोमलता, ज्ञानाची उत्सुकता, भविष्याची आशा
उद्याचा देश घडविणाऱ्या
बालगोपाळांना
बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!
वाचन प्रेरणा दिन
शरीरासाठी जसा व्यायाम गरजेचा असतो तसेच मेंदूसाठी वाचन महत्त्वाचे असते. बुधवार दि. १५/१०/२०२५ रोजी शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व लक्षात घेऊन पुस्तक प्रतिकृतीमध्ये व वाचन प्रेरणा दिन या शब्दमांडणीत बसून आवडीच्या पुस्तकांचे वाचन केले. तसेच शिशुवर्गातील बालचमुंनी क-- कमळाचा याप्रमाणे वाचनासाठी कमळ या शब्द मांडणीत बसून ताई - दादांच्या सोबतीने चित्र व अक्षरकार्डांचे वाचन करण्याचा प्रयत्न केला.
शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. खेडलेकरबाईंच्या शुभहस्ते डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या दिनाचे महत्त्व सौ. मनीषा कदम यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
भारतरत्न डॉ. कलाम यांच्या कार्यात्मक स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात, आनंदात बालसाहित्य वाचनाद्वारे आपल्या शाळेत बालचमुंनी साजरा केला. शांतताप्रिय, प्रसिद्ध अशा भारतीय शास्त्रज्ञ, भारताचे ११ वे राष्ट्रपती आणि भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. कलाम यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, आजीवन शिकण्याची सवय लावण्यासाठी प्रेरणा देणे हे उद्दिष्ट लक्षात घेऊन हा दिन साजरा करण्यात आला.वाचन आहे मनाचे अन्न,
वाचनाने होते मन प्रसन्न ,
नियमित वाचनाची धरू कास,
जीवनात येईल प्रगतीचा प्रकाश.
एकंदरीत विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगाचे श्रवण करून वाचन वाढवणे महत्त्वाचे आहे हे समजून घेतले व वाचन वाढविण्याचा संकल्प केला.
सत्र परीक्षा एक सुरू होण्यापूर्वी वेध लागतात ते दिवाळी सुट्टीचे तसेच मातीचे किल्ले बनविण्याचे. मातीचे किल्ले बनविणे ही आनंदाची आणि कौशल्याची बाब असते. मुलांच्या निरीक्षणशक्ती, कल्पनाशक्ती तसेच सृजनशीलतेचा विकास किल्ले बनविण्यातून होतो.
शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये पर्यावरणपूरक किल्ले बनविण्याचे काम सुरू झाले. यासाठी शिवनेरी किल्ला व सिंधुदुर्ग किल्ला यांची निवड केली. किल्ला बनविण्यासाठी पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला. गुगलचा आधार घेऊन किल्ल्याचा नकाशा पाहणे, किल्ल्याची इतर माहिती गोळा करणे, किल्ल्याची दिशा ठरविणे अशी कामे गटागटाने बालचमूंनी केली. किल्ल्यावरील मंदिरे, विहिरी यांच्या दिशा नकाशाच्या आधारे ठरवल्या.
या स्पर्धेचे परीक्षण मा. श्री. अमित वर्दे सर व मा. श्री. बापू मोरे सर यांनी केले. यावेळी शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी किल्ल्याची माहिती तसेच शिवरायांच्या जन्माचा पाळणा गायन, त्यांच्या पराक्रमाचे वर्णन करणारे पोवाडे गायन, शौर्यगीत गायन, संवाद सादरीकरण, किल्ल्याचे आत्मवृत्त, शिवगर्जना यांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या या उत्तम सादरीकरणामुळे अवघी शाळा "शिवमय" झाली.
इयत्ता तिसरीच्या शिवनेरी किल्ल्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. विद्यार्थ्यांच्या उत्तम सादरीकरणाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते
आश्विन महिन्यातील नवरात्र उत्सवात शाळेत शारदोत्सव साजरा करण्यात आला.
या काळात शाळा परिसरातील बालवाडीच्या ताईंनी देवीची, नवरात्राची माहिती सांगितली. २५ सप्टेंबर रोजी वरद किशोर अस्तेकर या विद्यार्थ्याने मनाचे श्लोक सादरीकरण केले. यावेळी श्री अमित वर्दे सर व श्री शशांक सहस्त्रबुद्धे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मनाच्या श्लोकांच्या पुस्तकाचे वितरण करण्यात आले. बालवाडीच्या विद्यार्थिनींनी नवदुर्गांचा वेश धारण करून
त्यांची रूपे सादर केली.
२९ सप्टेंबर २०२५ रोजी मुलींसाठी भोंडल्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळेस पारंपारिक पोशाखातील विद्यार्थिनींनी भोंडल्याची गाणी सादर केली. यावेळेस शाळेतर्फे खिरापत वाटण्यात आली.
१ ऑक्टोबर २०२५ रोजी खंडेनवमी निमित्त शाळेत पाटी पूजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पाटीवर सरस्वती काढून आणली. दसऱ्यानिमित्त शाळेत प्रसाद देण्यात आला.
खूप उत्साहात शाळेत नवरात्र उत्सव साजरा झाला.
कै. व पु.काळे आंतरशालेय कथाकथन स्पर्धा
सन 2025-2026
शाळेचे माजी विद्यार्थी, थोर कथाकथनकार, सुप्रसिद्ध साहित्यिक कै व. पु. काळे यांच्या स्मरणार्थ शनिवार दिनांक 20/9/2025 रोजी आंतरशालेय कथाकथन स्पर्धा शाळेत संपन्न झाली. यंदा स्पर्धेचे 23 वे वर्ष होते. स्पर्धेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम शाळेने स्पर्धकांचा वाढता सहभाग पाहता पीवायसी कम्युनिटी हॉल येथे आयोजित केला. यावर्षी स्पर्धेत विशेष म्हणजे पुणे शहर व परिसरातील 28 नामांकित शाळांमधील एकूण 175 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे उद्घाटन संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगर माननीय श्री. रविंद्रजी वंजारवाडकर सर यांच्या शुभहस्ते झाले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शाला समितीच्या अध्यक्षा मा. मैत्रेयी देसाई, शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ मोनिका खेडलेकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सहभागी शाळांचे स्पर्धक, पालक शिक्षक इ. उपस्थित होते.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण मा. गीतांजली शर्मा, शाळा समितीच्या महामात्रा मा. डॉक्टर अश्विनी पाटील आणि शाळेच्या मा. मुख्याध्यापिका यांच्या शुभहस्ते झाले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
प्रथम क्रमांक
गार्गी ज्ञानेश वैद्य
मा स गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालय
द्वितीय क्रमांक
श्रुतिका संजय फाटक
अभिनव विद्यालय इंग्रजी माध्यम
तृतीय क्रमांक
धृती बेझबरुआ बिश्वजीत
सिम्बॉयसिस शाळा
उत्तेजनार्थ क्रमांक एक
कैवल्या अमित लोखंडे
साने गुरुजी प्राथमिक विद्यालय
उत्तेजनार्थ क्रमांक दोन
तन्वी नवनाथ मोटे
म ए सो भावे प्राथमिक शाळा
ज्ञानाचा प्रकाश देण्या---
दिवा अखंड जळतो!
जीवनाचा खरा अर्थ
शिक्षकांमुळेच कळतो.
सोमवार दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी बाल शिक्षण मंदिर शाळेत शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा.मुख्याध्यापिका सौ. मोनिका खेडलेकर यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बाईंनी सर्वांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून इयत्ता चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत अध्यापनाचा आनंद घेतला.
रोजच्या प्रमाणे परिपाठासाठी मुले जमली मात्र आज पूर्ण परिपाठ शिक्षक रुपी विद्यार्थ्यांनी घेतला. चौथीतील श्रेया वाणी या विद्यार्थिनीने मुख्याध्यापकीय मनोगत सुद्धा व्यक्त केले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे विद्यार्थ्यांनी सेवकांची भूमिका पार पाडत शाळेची घंटा सुद्धा दिली. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी पूर्व प्राथमिक वर्गावर अध्यापन करीत गाणी, गोष्टींचा आनंद घेतला.
मा. मुख्याध्यापिका सौ. खेडलेकरबाई यांच्या हस्ते या शिक्षक रुपी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब कोथरूड विभागाचे अध्यक्ष मा. गिरीश गणात्रा यांच्या हस्ते सर्व गुरूजनांचा सन्मान करण्यात आला.
अशाप्रकारे अतिशय उत्साहात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
गणेशोत्सव
रूप सुंदर पवित्र मनोहर,
एकदंत तू तूच विघ्नहर,
सुखकर्ता तू परम विघ्नेश्वर,
सर्व सिद्धीचा तूच परमेश्वर.
अशा या श्रीगणेशाच्या गणेशोत्सवातून शाळेतील बालचमुंच्या सृजनशीलता, सामाजिक बांधिलकी,नेतृत्वगुणास वाव मिळावा म्हणून यावर्षी शाळेने प्लास्टिकमुक्त गणपती सजावट तसेच स्वच्छतेचा ध्यास ध्यानी घेऊन गणेशोत्सव साजरा केला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या ढोल पथकाच्या गजरात बुधवार दि.27/08/2025रोजी गणेशाचे स्वागत करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना मा.मुख्याध्यापिकांच्या सहकार्याने उपस्थित विद्यार्थी, पालक,शिक्षकवृंद यांच्या समवेत करण्यात आली.
इको फ्रेंडली सजावट.
स्वच्छतेचे महत्व सांगणारे तसेच पर्यावरण रक्षणाचा मंत्र देणाऱ्या घोषवाक्यांचा, शब्दपट्ट्यांचा वापर करून बाप्पांच्या आवडीचे मोदक,आवडीच्या पत्री यांच्या सजावटीने विद्यार्थ्यांपर्यंत,उपस्थितांपर्यंत विविध बोधपर संदेश पोहोचविले.शाळेतील इयत्ता दुसरी ते चौथीच्या एकूण 180 विद्यार्थ्यांनी पर्यावरणस्नेही बीजगणेश मूर्ती कार्यशाळेत सहभागी होऊन मूर्ती बनविल्या.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आयोजित गणेशोत्सव स्पर्धेत
विद्यार्थ्यांनी गुरुवार दि.28/08/2025 रोजी विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले.त्यात गणपतीचे अभिनय गीत,अथर्वशीर्ष पठण,स्वच्छतेवर आधारित कृतीयुक्त गीत,स्वच्छता-आरोग्य यांचे महत्त्व सांगणारे इंग्रजी नाटक,गणपतीची इंग्रजीतून माहिती इत्यादींचा समावेश होता.याचे परीक्षण श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट,पुणे यांचेमार्फत मा.अ.ल.देशमुख (शिक्षणतज्ञ)मा.मोहित चांदोरकर यांनी केले.
विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट भांडारकर रोड या मंडळासमोर इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणाद्वारे स्नेहपूर्ण सलोखा निर्माण केला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,पुणे येथे शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थी,मा.मुख्याध्यापिका,शिक्षक व पालक यांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठणात दि.4/09/2025रोजी सहभाग घेतला.
एकंदरीत सर्व कार्यक्रमांचे सादरीकरण,सजावट याद्वारे विद्यार्थ्यांनी हा गणेशोत्सव स्वच्छता प्रिय,आरोग्य जपणारा,पर्यावरण पूरक,वाहतुकीचे नियम पाळणारा,लहान-थोरांना जपणारा तसेच आपल्या संस्कृतीचे जतन करणारा असावा असा संदेश दिला. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी व आनंदासाठी बाप्पाकडे आशीर्वाद मागितला.
भालचंद्र गजानना तू,
अवघ्या दिनांच्या नाथा तू,
गणराया शाळेत तुझ्या येण्याने,
हर्षे उल्हासली बालचमूंची मने.
शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी म.ए..सो.बालशिक्षण मंदिर शाळेत
साजरा करण्यातआला.
या कार्यक्रमास शाळेच्या माजी विद्यार्थिनी सौ. ज्योती ब्रम्हें या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
प्रसिद्ध भारतीय हॉकीपट्टू मेजर ध्यानचंद यांना मानवंदना देऊन व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या वेळेस मुलांनी क्रीडा प्रतिज्ञा घेतली. मुलांना राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व सांगण्यात आले. प्रमुख पाहुण्या ज्योती ब्रम्हें यांनी मुलांना व्यायाम व आहार यांचा आरोग्याशी असणारा संबंध हा विविध उदाहरणातून समजावून दिला.
त्यांनी मुलांकडून विविध व्यायाम प्रकार व आसने करून घेतली. या कार्यक्रमांमध्ये मुलांनी फनी गेम्स चा मनमुराद आनंद लुटला.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या घोषवाक्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हातून मूर्ती घडो पर्यावरणस्नेहाची.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध वनस्पतींच्या बिया वापरून शाडूमातीपासून गणेश मूर्ती तयार केल्या. गणेशाची मूर्ती बनविल्यानंतर विद्यार्थ्यांनी मनोभावे सामूहिकरित्या शाळेच्या मुख्याध्यापिका , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासमवेत गणपती स्तोत्र व अथर्वशीर्षचे पठण केले. याच वेळेस इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी बाल गणेशाच्या चित्रात रंगभरण केले. गणेशचतुर्थीला याच बीजगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना घरी करण्याचा विद्यार्थ्यांनी संकल्प केला.
बाशिमचा बाप्पा येईल घरोघरी,
उत्सवाची शोभा वाढविल दारोदारी.
🌹 गणपती बाप्पा मोरया🌹
बा.शि.म.च्या बालचमुने रचला इतिहास
म.ए.सो.बाल शिक्षण मंदिर या प्राथमिक शाळेतील एक नव्हे -दोन नव्हे तर तब्बल १९ विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत सुयश संपादन केले आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्यावतीने घेतल्या जाणाऱ्या 🌹 ज्ञानवर्धिनी शिष्यवृत्ती परीक्षेत ओळीने पहिले पाचही क्रमांक पटकावून एकूण बारा गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांपैकी तब्बल आठ विद्यार्थी हे बाल शिक्षण मंदिर डेक्कन जिमखाना,पुणे४. या मराठी माध्यम शाळेचे आहेत. 🌹ज्ञानांजन शिष्यवृत्ती परीक्षेतही ही इ.३ रीचे ८ व इ.४थीचे ३ असे एकूण ११ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. 🌹 महाराष्ट्र ज्ञानपीठ इंग्रजीपरीक्षेत इ.३री चा चि.करण अजित ठोंबरे हा विद्यार्थी ५० पैकी ५० गुण मिळवून राज्यात प्रथम. 🌹 इ. ४थीची कु. दूर्वा अशोक बोत्रे. ही विद्यार्थिनी १०० पैकी १०० गुण मिळवून राज्यात प्रथम. 💐शाळेचे ८४ % विद्यार्थी विशेष योग्यता प्राप्त 💐 सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये शाळेचा निकाल १०० % यशस्वी असा लागला आहे.शाळेसाठी ही निश्चितच शाळेच्या इतिहासात नोंद व्हावी अशी अभिमानास्पद बाब आहे.
असे उत्तुंग यश प्राप्त केलेले सर्व विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे शाळेच्यावतीने मा. मुख्याध्यापिका आणि शाळा समिती मा. पदाधिकारी म.ए. सो.यांनी हार्दिक अभिनंदन व कौतुक केले आहे.💐💐💐💐
नागपंचमी
श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. सर्व स्त्रिया व मुली या सणाची वाट पहात असतात. आपल्या शाळेत देखील हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी सोमवार दिनांक २८/०७/२०२५ रोजी शाळेमध्ये नागपंचमी हा सण साजरा केला गेला.
पहिली व दुसरीच्या मुलांनी क्ले मातीचे नागोबा करून आणले होते तर तिसरी व चौथीच्या मुलांनी वारुळाचे चित्र काढून ते छान रंगांमध्ये रंगविले होते. नागोबाच्या प्रतिमेची पूजा मा. मुख्या. सौ सुनिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर नागपंचमीची गाणी म्हणत मुलींनी त्यावर फेर धरले. झिम्मा, फुगडी यासारख्या खेळात मुलींबरोबर शिक्षिका देखील आनंदाने सहभागी झाल्या होत्या.
नागपंचमी हा सण साजरा करण्यामागचे महत्व शिक्षकांनी समजावून सांगितले. सर्व मुलींनी आणि मुलांनी देखील या उत्सवात आनंदाने भाग घेतला होता. अशा रितीने अतिशय उत्साहामध्ये नागपंचमी हा सण शाळेमध्ये साजरा झाला.
ना वयाचे बंधन..
ना नात्यांचे जोड
ज्याला आहे अगाध ज्ञान
जो देई निस्वार्थ दान
गुरू त्यासी मानावा
देव तेथेची जाणावा..
गुरुवार दि.१०/०७/२०२५ रोजी शाळेत गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून बालसभेचे आयोजन केले होते.प्रथम मा. मुख्याध्यापिका यांच्याहस्ते गुरूंच्या प्रतिमेचे आणि सरस्वतीचे पूजन करण्यात आले.बालसभेत विद्यार्थ्यांना गुरू शिष्यांची गोष्ट सांगून गुरूंचे महत्त्व सांगण्यातआले. गुरूंच्याप्रति आदर,नम्रता, आज्ञाधारकता, गुरूनिष्ठा ही मूल्ये रूजविण्यासाठी या संस्कारात्मक बालसभेचे आयोजन केले होते.तसेच गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेत नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुख्याध्यापिका सुनिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली साकार झालेले शिशुशाळेतील नूतन वर्ग व बालवाटिकेचे उद्घाटन म.ए.सो.नियामक मंडळ सदस्य मा.डॉ.विवेक कानडे यांच्या शुभहस्ते झाले.तसेच आधुनिक शिक्षणाचे द्वार खुले करणाऱ्या स्मार्ट बोर्डचे उदघाटनही याप्रसंगी करण्यात आले.या कार्यक्रमासाठी शालासमिती महामात्रा मा.डॉ.अश्विनी पाटील,म.ए.सो.क्रीडावर्धिनीचे समन्वयक, क्रीडाभारती पुणेमहानगर अध्यक्ष मा.शैलेश आपटे तसेच डॉ.भक्ती दातार यांच्यासह सन 1985-86च्या बॅचचे माजी विदयार्थी (ज्यांनी बालवाटिकेतील लॉनसाठी उदारहस्ते आर्थिक मदत दिली.) आणि शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी इ.उपस्थित होते. मा.मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांना समयोचित मार्गदर्शन केले.त्यांच्याहस्ते
सर्व गुरूजनांचा यावेळी सन्मान करण्यात आला.अशा प्रकारे अतिशय उत्साहात, आनंदात हा कार्यक्रम संपन्न झाला.
डेक्कनच्या अंगणात बालशिक्षणचे रिंगण
पुणे दि.५ पाऊले चालती पंढरीची वाट, विठूच्या दर्शनाची लागलीसे आस !
आषाढी एकादशीनिमित्त इयत्ता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांचा स्वच्छता वारी, वृक्षदिंडीसह पालखी सोहळा रंगला. इ. पहिली ते चौथीचे छोटे विद्यार्थी विठू माऊली, रुक्मिणी आणि विविध संत, वारकरी यांच्या भूमिकांमध्ये रमले.
वाजतगाजत शाळेपासून निघालेली ही पालखी डेक्कन जिमखाना, गोखले चौकातील कलाकार कट्टा या ठिकाणी विसावली. यावेळी विद्यार्थ्यांनी भजन, अभंग यांचे सादरीकरण केले. फुगडी, फेर रिंगण या गोष्टींचा मनमुराद आनंद लुटला. या ठिकाणी समाज प्रबोधन करताना शाळेच्या मा. मुख्याध्यापिका यांनी नदीस्वच्छता निसर्ग-संगोपन, स्वच्छ, सुंदर पुणे याविषयी मनोगत व्यक्त केले. तसेच शाळेत राबविल्या जाणाऱ्या स्वच्छता उपक्रमांविषयी सर्वांना माहिती दिली. कलाकार कट्टा परिसरातील उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला भरभरून दाद दिली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
दिंडी सोहळ्यासह पालखी शाळेच्या प्रांगणात परतली. उपस्थित सर्वांना प्रसाद वाटप करून सोहळ्याची सांगता करण्यात आली.
"योग अभ्यास ही प्रासंगिक व्यायाम पद्धती न राहता जीवनशैली व्हावी"- सौ. सुनिता चव्हाण
पुणे दि.२१. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल शिक्षण मंदिर शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन नव्या उर्जेने व उत्साहाने साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विविध योग प्रात्यक्षिके व शांतीपाठ शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले. या प्रात्यक्षिकात शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले व योग जीवन पद्धती अवलंबण्याचा सर्वांनी दृढसंकल्प केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका यांनी योगाभ्यास केवळ एक व्यायाम पद्धती न राहता ती आपली जीवनपद्धती झाली पाहिजे आपण समतोल आहार, विहार, सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार या सर्वच बाबतीत सातत्य ठेवले पाहिजे असे प्रतिपादन केले.
श्री लखे सर यांनी सूत्रसंचालन केले तर सौ.प्रमिला कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.
म.ए. सो. बाल शिक्षण मंदिर पुणे-४ 🌹
चिमुकल्या पावलांनी ज्ञानमंदिर हे गजबजले.
निर्जीव भिंतींना या जणू त्यांचे श्वास येऊन भेटले. सोमवार दिनांक 16 जून 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली. त्यानिमित्ताने शाळा छान सजली होती. मंगलमय वातावरणात सनईच्या सुरांमध्ये मुलांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. मुलांसाठी सेल्फी पॉईंट, गोड खाऊ, गंमत गोष्टी, खेळ यांची योजना करण्यात आली होती . विद्यार्थ्यांना शासनाकडून प्राप्त पाठ्यपुस्तकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते झाले . पहिलीचे विद्यार्थी शाळेत नवीन असल्याने त्यांच्यासाठी शाळेचा पहिला दिवस महत्त्वाचा म्हणून त्यांच्या हस्ते लेखनसाहित्याचे, सरस्वतीचे , शाला माता तसेच शालामातेच्या पहिल्या पायरीचे पूजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमात त्यांच्यासोबत असलेल्या मा. शालासमिती अध्यक्षा सौ. मैत्रेयी देसाई यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले यातून विद्यार्थ्यांवर पर्यावरण संवर्धनाचा संस्कार करण्यात आला. मा.शालासमिती अध्यक्षा आणि शाळेच्या मुख्याध्यापिका यांनीही विद्यार्थ्यांचे औक्षण करून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा प्रथमदिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी असणारे विनायक नवयुग मित्र मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले त्यांनीही मुलांना खाऊचे वाटप करून शुभेच्छा दिल्या.




















































































































