सुदिनम् सुदिनम् जन्मदिनम् |
भवतु मंगलम् जन्मदिनम् |
म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर, डेक्कन जिमखाना शाळेचा वर्धापन दिन सोहळा दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी संपन्न झाला. शाळेने शतकोत्तर तिसऱ्या वर्षात पदार्पण केले. या सोहळ्याचे औचित्य साधून शाळेत नव्याने बांधलेले स्टेज, संरक्षक भिंत तसेच वॉटर प्युरिफायर व कुलर यांचे उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी व म. ए. सो.चे माननीय अध्यक्ष एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या शुभहस्ते झाले.
या प्रसंगी म.ए. सो.चे मा. उपसचिव सुधीर भोसले, शाला समितीच्या मा. अध्यक्षा मैत्रेयी देसाई, मा. महामात्र डॉ. अश्विनी पाटील, मा. मुख्याध्यापिका सौ. सुनिता चव्हाण, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी व पालक इ.उपस्थित होते. मा.भूषणजी गोखले यांनी यावेळी सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या प्रगतीचा चढता आलेख पाहून आनंद व्यक्त केला.
शाळेत नुकत्याच सुरू केलेल्या कौशल्य विकास वर्गांच्या विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. अबॅकस, तायक्वोंदो, गीत गायन, इंग्रजी नाटुकले, नृत्य यांचे उत्कृष्ट सादरीकरण करून मान्यवरांची मने जिंकली.
या प्रसंगी शाळेच्या विविध विकास कामांसाठी सहाय्य करणारे हितचिंतक, माजी विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. अशा तऱ्हेने शाळेचा शतकोत्तर तिसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला.












