म.ए.सो.बाल शिक्षण मंदिर व शिशु मंदिर शाळेचे एकत्रित वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शाळेच्या मैदानावर उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला . याप्रसंगी 'कुटुंब संवर्धन' या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित विविध नृत्याविष्कार,नाट्य,पोवाडा, दिंडी,भारुड, पाळणा इ. उत्तमोत्तम कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मा.श्री विलास जावडेकर तर अध्यक्षस्थानी म.ए.सो.चे उपाध्यक्ष मा. श्री प्रदीप नाईक उपस्थित होते. कार्यक्रमाला शाला समिती अध्यक्षा मा. सौ. मैत्रेयी देसाई व शाळेच्या महामात्रा मा. डॉ. अश्विनी पाटील उपस्थित होत्या.
" लखलखते दिवे
नवचैतन्याची जाण मनाला
चहुकडे सुखाची उधळण
असे दिवाळी सणाला"
दिव्यांचा सण असणारी दीपावली शाळेमध्ये अत्यंत उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी विविध रंगांमध्ये सुंदर व आकर्षक पणत्या रंगविण्याचा आनंद लुटला. दिवाळीमध्ये महत्त्व असते ते आकाशकंदिलाचे! यानिमित्ताने शाळेमध्ये इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांची 'आकाश कंदील बनविणे' कार्यशाळा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे सुंदर सुंदर आकाशकंदील बनविले. दिवाळीनिमित्त विद्यार्थ्यांनी बनविलेल्या आकाशकंदिलांची सजावट शाळेत करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांनी दिवाळी शुभेच्छा भेटकार्डे बनविली. विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक किल्ले बनविले. दिवाळीतील चारही दिवसांचे महत्त्व सांगणारी प्रतिकृती शाळेत तयार करण्यात आली. याद्वारे विद्यार्थ्यांना दिवाळीची माहिती सांगण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले.
शाळेच्या मा. मुख्याध्यापिका यांनी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक यांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
म.ए.सो.बाल शिक्षण मंदिर, पुणे-४. वाचन प्रेरणा दिन
ग्रंथ आमचे साथी,
ग्रंथ आमच्या हाती,
ग्रंथ उजळती अज्ञानाच्या,
अंधाराच्या राती.
या ओळींना समर्पक असे थोर व्यक्तिमत्त्व म्हणजे आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम. भारतरत्न डॉ. कलाम यांच्या कार्यात्मक स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात आणि आनंदात बालसाहित्य वाचनाद्वारे आपल्या शाळेत बालचमुंनी साजरा केला.
स्वप्ने ती नसतात जी तुम्ही झोपेत बघता...…
स्वप्ने तर ती असतात जी तुम्हाला झोप लागू देत नाहीत......
असे म्हणणाऱ्या डॉ.कलाम यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण प्रसंगांचे कथन करण्यात आले. स्वतःचे वाचन कौशल्य, संशोधन वृत्ती, निरीक्षण क्षमता इ.गुण वाढविणे महत्त्वाचे आहे हे विद्यार्थ्यांनी या माध्यमातून समजून घेतले. विद्यार्थ्यांनी गोष्टींची पुस्तके, उतारे, मजकूर कार्ड, भित्तीपत्रके, वर्तमानपत्र यांच्या वाचनाद्वारे वाचन संस्कृतीचे जतन करून मिसाईलमॅन डॉ.कलाम यांच्या प्रति आदर व्यक्त केला.
यादेवी सर्व भुतेषु
शक्ति रुपेण संस्थिता
नवरात्री निमित्त शुक्रवार दि. 11/10/2024 रोजी शाळेत भोंडल्याचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त वर्गावर्गातून सुशोभन करण्यात आले. रंगीत पोशाखातील विद्यार्थ्यांनी शाळेचे आवार गजबजून गेले. फुलांनी सजविलेल्या हत्तीच्या प्रतिकृतीचे पूजन शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. सुनिता चव्हाण मॅडम यांनी केले. विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी फेर धरून भोंडल्याची पारंपारिक गाणी गायली. यात शिवाजी आमुचा राजा... ऐलमा पैलमा... कारल्याचा वेल.. इत्यादी गाणी होती. या वेळेस शाळा या कुटुंबातील भोंडला फक्त मुलींचाच असे न मानता समानतेचा धागा धरून सर्वांनीच भोंडल्याचा आनंद लुटावा असे मा. मुख्याध्यापिका यांनी सांगितले.
याच दिवशी दुपारी 3.30 वा. शाळेच्या महिला प्रतिनिधी व स्त्री पालकांच्या भोंडल्याचे आयोजन करण्यात आले. कुटुंबातील महत्त्वपूर्ण घटक म्हणून 'स्त्री' चे महत्त्व अनन्य साधारण आहे. नवरात्रीतील भोंडल्यानिमित्त आपल्या गायन, नृत्य कलेचे सादरीकरण स्त्री पालकांनी भोंडल्याच्या पारंपारिक गीतावर ताल धरून केले. यावेळेस स्त्रियांना मार्गदर्शन करताना मा. मुख्याध्यापिका यांनी स्त्रियांनी आपले कलागुण जोपासावे, स्वतःसाठी वेळ द्यावा, आरोग्याकडेही लक्ष द्यावे असे सांगितले. शेवटी शाळेतर्फे खिरापत देण्यात आली. या भोंडल्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महिला पालक, सेवक उपस्थित होते.
कै. व.पु.काळे आंतरशालेय कथाकथन स्पर्धा- २०२४-२५
शाळेचे माजी विद्यार्थी, थोर कथाकथनकार, सुप्रसिद्ध साहित्यिक कै.व.पु.काळे यांच्या स्मरणार्थ शनिवार दि. २१/०९/२०२४ रोजी आंतरशालेय कथाकथन स्पर्धा शाळेत संपन्न झाली. यंदा स्पर्धेचे २२ वे वर्ष होते. स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी, सनदी लेखापाल मा. श्री.सुहृद लेले यांच्या शुभहस्ते झाले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी शालासमिती महामात्रा मा. डॉ.अश्विनी पाटील, शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. सुनिता चव्हाण,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सहभागी शाळांचे स्पर्धक, पालक, शिक्षक इ .उपस्थित होते.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण सन्माननीय प्रमुख अतिथी प्रांत प्रमुख मा.श्री.विवेकजी देशपांडे. पर्यावरण संरक्षण गतिविधि सहसंयोजक (महाराष्ट्र पश्चिम प्रांत) यांच्या तसेच शालासमिती अध्यक्षा मा. मैत्रेयी देसाई आणि शाळेच्या मा.मुख्याध्यापिका यांच्या शुभहस्ते झाले.
यावर्षीच्या स्पर्धेत विशेष म्हणजे पुणे शहर व परिसरातील २३ नामांकित शाळांमधील एकूण ११९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
गणेशोत्सव
निराकार ओंकार निर्गुण रूप
गणेशा तुझे रूप तेज: स्वरूप
विद्येची, बुद्धीची देवता म्हणून आपण गणपती बाप्पास ओळखतो. लहान मुलांच्या कल्पनाशक्तीला, सुप्त कलागुणांना, नेतृत्वाला तसेच त्यांच्या समाजाप्रती समर्पण वृत्तीला चालना देण्यासाठी शाळेने यावर्षी वैशिष्ट्यपूर्ण शालेय गणेशोत्सव साजरा केला.
1)पर्यावरणस्नेही बीजगणेशमूर्ती कार्यशाळा
शाळेतील दुसरी ते चौथीच्या एकूण 208 विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला होता. विविध वनस्पतींच्या बिया वापरून शाडूमाती पासून गणेशमूर्ती बनविण्यात आल्या. याच मूर्तीला रंगकाम करून विद्यार्थ्यांनी आपल्या घरी गणेश चतुर्थीला तिची प्रतिष्ठापना केली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांबरोबर शाळेच्या संपूर्ण कर्मचारी वर्गाने सहभाग घेतला. या बीजगणेशमूर्तीचे विसर्जन घरी बादलीत पाणी घेऊन करण्यास सांगून ते बीजमिश्रित पाणी घराभोवतालच्या परसबागेत, कुंड्यात टाकण्यास सांगण्यात आले. जेणेकरून बीज मातीत रुजून नवीन रोपे तयार होतील व त्याचे संगोपन केल्याने पर्यावरण रक्षणास मदत होईल.
2)शालेय गणेशोत्सवातील सृजनशील (नाविन्यपूर्ण) सजावट
सजावटीसाठी गणेशोत्सवाचे पावित्र्य राखणाऱ्या घोषवाक्यांचे फलक, तक्ते तसेच बोलक्या पताका वापरण्यात आल्या होत्या. त्यातून समाजप्रबोधन करण्यात आले.
वाचनाचे महत्त्व ओळखून मुलांनी वाचनास प्रवृत्त व्हावे म्हणून बालसाहित्यिकांच्या कथा, मासिके, तक्ते ,वाचनकार्डे , उतारे इत्यादी शैक्षणिक साहित्यांचे विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष वाचन करून घेण्यात आले व त्यांचे प्रदर्शनही भरविण्यात आले.
कुटुंबसंवर्धन या उपक्रमाअंतर्गत प्राणी,पक्षी, शेतकरी यांची मांडणी प्रतिकृतीच्या रुपात करण्यात आली. त्यातून कुटुंबसंवर्धनाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
* आनंददायी शनिवार साजरा करीत असताना विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तुतून तयार केलेल्या टिकाऊ वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या.
3)नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे सादरीकरण
यंदा शाळेने गणेशोत्सवात समाज जागृतीच्या कार्यक्रमांची मांडणी केली. गणेशोत्सवाचे पावित्र्य चांगल्या पद्धतीने राखले जावे ही तळमळ इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण व बाळगोपाळ यांच्या पथनाट्यातून मांडली. बाल गणेशाच्या कुटुंबाने गणेशोत्सवात होणाऱ्या ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण इत्यादीमुळे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास कसा थांबवावा हे पथनाट्यातून उत्तमरित्या सांगितले.संस्कृत श्लोकांचे उच्चारण, मानसिक शांती, स्थिरता तसेच आत्मविश्वास वाढणे इत्यादी सकारात्मक बदलाकरिता गणपतीस्तोत्र, अथर्वशीर्ष पठण घेण्यात आले. गणपतीचे अवयव, आवडीचे खाद्यपदार्थ,पत्री यांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षदर्शी सादर केले. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी समाजप्रबोधनपर घोष फलकांचे अर्थासहित सादरीकरण केले.
एकंदरीत सर्व कार्यक्रमांच्या सादरीकरणातून बाल सवंगड्यांनी गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक, लहान थोरांना जपणारा, आपल्या संस्कृतीचे जतन करणारा असावा असा संदेश दिला .
4)श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे आयोजित गणेशोत्सव स्पर्धा
गणेश चतुर्थीच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गणपती स्तोत्र, अथर्वशीर्ष पठण, गणपतीचे गाणे, विविध पथनाट्य इत्यादी कार्यक्रम स्पर्धेच्या माध्यमातून सादर केले.याचे परीक्षण श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे यांचे मार्फत मा.अ.ल. देशमुख (शिक्षणतज्ञ) व मा.मोहित चांदोरकरसर यांनी केले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक तसेच सामाजिक संदेश देणारे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम शालेय परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळासमोर सादर करून उपस्थितांची शाबासकी मिळविली.
यात पुढील मंडळांचा समावेश होता
1)कलाकार कट्टा ,गुडलक चौक
2)श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, पुणे
3)केसरीया मित्रमंडळ,फर्ग्युसन रोड
4)गोखले स्मारक चौक मित्रमंडळ ट्रस्ट
5)विनायक नवयुग मित्रमंडळ ट्रस्ट, भांडारकर रोड
महावाचन
वाचनाने घेतलेले ज्ञान हे कायमस्वरूपी स्मरणात राहते हे लक्षात घेऊन विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आयोजित महावाचनात इयत्ता तिसरी व चौथीच्या एकूण 224 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वाचनाचा संकल्प केला.
केल्याने होत आहे रे
आधी केलेची पाहिजे
खरोखर सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून विविध कार्यक्रमांच्या सादरीकरणातून शालेय बालगणेश भक्तांनी समाजाशी विधायक सलोखा निर्माण केला.
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
म.ए.सो.बाल शिक्षण मंदिर शाळेची आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेतील चमकदार कामगिरी
म.ए.सो.भावे प्राथमिक शाळा , पुणे तर्फे आयोजित आशिष चांदोरकर स्मृती करंडक आंतरशालेय नाट्यवाचन स्पर्धेमध्ये म.ए.सो.बाल शिक्षण मंदिर शाळेने तृतीय क्रमांक पट कावला आहे. या स्पर्धेत कु. प्रांजल प्रसाद खेडेकर.(इ.४थी मृगगट.) या विद्यार्थिनीस उत्कृष्ट वाचनाचा पुरस्कार मिळाला असून सर्वोत्कृष्ट संहिता लेखनाचा पुरस्कार आपल्या शाळेतील सहाय्यक शिक्षिका सौ. मनिषा कदम यांना मिळाला आहे.
शाळेतील शिक्षिका सौ. अनिता आगळे यांचे नाट्यवाचन स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य लाभले. म. ए.सो.चे माननीय पदाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनिता चव्हाण यांनी सुयशाबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
गोकुळाष्टमी - पुस्तकहंडी
सोमवार दि.२६/०८/२०२४ रोजी शाळेत पुस्तकहंडी चा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
कुटुंब संवर्धन प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णपरिवार पात्रानुसार वेशभूषा करून सादर केला. श्रीकृष्ण परिवारातील देवकी - वसुदेव , नंद - यशोदा, रुक्मिणी, बलराम, सुदामा, गोपिका, बालगोपाळ, मित्र परिवार अशा विविध वेशभूषा मुलांनी साकारल्या होत्या.
इ.३री च्या विद्यार्थ्यांनी कृष्ण व त्याचा रुसलेला मित्र पेंद्या यांच्यातील संवाद अभिनय गीतातून सादर केला. इ.४थी च्या मुलांनी श्रीकृष्णाची गाणी सादर केली. सर्व विद्यार्थी कार्यक्रम पाहण्यात तल्लीन होऊन गेले होते.
मनोरंजनाचे कार्यक्रम झाल्यानंतर इ. ४ थी चे मुलगे व मुली पुस्तकहंडी फोडण्यास सज्ज झाले. त्यांनी अगोदरच थर रचण्याचा सराव केला होता. प्रथम मुलींनी कौशल्याने थर रचून पुस्तकहंडी फोडली. नंतर मुलांनीही कुशलतेने थर रचून दुसरी पुस्तकहंडी फोडली. गोविंदाची गाणी म्हणत इतर विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे कार्यक्रमाचा आनंद घेतला.
पुस्तकहंडी फोडल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी तयार केलेला दहीकाला विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून देण्यात आला. सामाजिक बांधिलकीचे भान जपत शाळेभोवतालच्या सोसायटीमधील वॉचमन काका, श्रमिक बांधव व स्वच्छता कर्मचारी यांना दहीकाल्याचे वाटप करण्यात आले.
शिक्षकांनी मुलांना या उत्सवाचे महत्व व श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित गोष्ट सांगितली तसेच पुस्तक हंडीद्वारे पुस्तके वाचण्याची प्रेरणा दिली.
अशा प्रकारे कौटुंबिक, सामाजिकतेची जाणीव करुन देणाऱ्या गोकुळाष्टमीच्या उत्सवात सारे यिद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.
रक्षाबंधन
" असावी सर्वांच्या
त्या रक्षणाची जाण
रेशीम गाठीतून
उलगडते कर्तव्याचे भान
पवित्र रक्षण बंधनातून
जाणती हे सान!"
शनिवार दिनांक १७/०८/२०२४ रोजी शाळेत अतिशय उत्साहात व आनंदात रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी संदेशपर राख्या तयार करून व एकमेकांना रक्षाबंधन करुन हा सण साजरा केला.
मेळघाट येथील आदिवासी बांधवांना मदत म्हणून त्यांच्याकडून राखी साहित्य विकत घेतले व त्यापासून सुंदरशा राख्या तयार केल्या.
सामाजिक बांधिलकी जपत पोलीस, पोस्टमन, आपले सामाजिक बांधव, विशेष गरजा असणारे विद्यार्थी यांना देखील रक्षाबंधन केले.
वर्गावर्गात विद्यार्थ्यांनी एकमेकांना औक्षण करून राखी बांधली व एकमेकांना सदैव मदत करण्याचे ठरवले.
शाळेजवळील प्रसन्न ऑटिझम सेंटरला विद्यार्थिनींनी भेट दिली. तेथील विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी सुसंवाद साधला आणि त्यांना राखी बांधून त्यांच्याविषयी स्नेहभाव व्यक्त केला.
शाळेतील शिक्षक लेखनिक सेवक वर्ग यांनाही राखी बांधून त्यांच्या प्रति स्नेहभाव व्यक्त केला. अशाप्रकारे आपल्या अवतीभवती चा समाज हे देखील आपले कुटुंबच आहे हा भाव विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनातून व्यक्त केला व आपल्या कुटुंबाची सीमारेषा वाढवली.
स्वातंत्र्यदिनी गर्जले बालशिक्षणचे बाल !
पुणे- दि.१५ ऑगस्ट २०२४ - म.ए.सो. बाल शिक्षण मंदिर शाळेत देशाचा ७८ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. समरगीत व विविध घोषणांनी शालेय परिसर दुमदुमून गेला.
याप्रसंगी बोलताना प्रमुख अतिथी मा. मैत्रेयी शिरोळकर यांनी सामाजिक संदेश देत स्वतंत्र भारताविषयी अधिक जाणून घेऊयात असे मत व्यक्त केले. विशेष अतिथी मा. डॉ. राधिका परांजपे यांनी खूप अभ्यास करा व मोठे व्हा,सोबत आरोग्यही उत्तम ठेवा असा संदेश दिला तर अध्यक्षीय भाषणात मा. मैत्रेयी देसाई यांनी पालकांनी मराठी शाळेवर दाखविलेला विश्वास कौतुकास्पद आहे.हा विश्वास नक्कीच सार्थकी ठरेल असे सांगून शाळेवरील आपला विश्वास व्यक्त केला. शाळेच्या मा. महामात्र डॉ.अश्विनी पाटील यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या तर शाळेच्या शिक्षिका सुरेखा कांबळे यांनी काही विशेष संकल्प आजच्या दिवशी करावेत,असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी ढोल ताशाच्या ठेक्यावर 'झेंडा अमुचा प्रिय देशाचा' हे समरगीत सादर केले.
याप्रसंगी शाला समितीच्या अध्यक्षा मा. मैत्रेयी देसाई, महामात्र मा. डॉ. अश्विनी पाटील, शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सुनिता चव्हाण, शाळेच्या माजी विद्यार्थिनी डॉ.भक्ती दातार यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सुनिता चव्हाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. ज्येष्ठ शिक्षिका विद्या शिरोडे यांनी सूत्रसंचालन केले.
कुटुंबदिन
कुटुंब संवर्धन प्रकल्पांतर्गत शनिवार दिनांक १०/०८/२०२४ रोजी कुटुंबदिन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आजी माजी विद्यार्थी,शिक्षक,पालक इ. उपस्थित होते.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले फूल व भेटकार्ड देऊन माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनिता चव्हाण यांनी केले.त्यांनी 'शाळा' या कुटुंबाचे महत्व सांगितले तसेच आजी माजी विद्यार्थी यांचे कुटुंबातील स्थान किती महत्वपूर्ण आहे ते स्पष्ट केले.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी करमणूकीचे कार्यक्रम सादर केले .माजी विद्यार्थी डॉ. श्रीधर चिपळूणकर यांनी शाळेतील 'मैत्रीचे महत्व' स्वानुभव सांगून पटवून दिले.तर डाॅ.सुधीर उजळंबकर सर यांनी मुलांना गणपतीच्या गोष्टीतून कुटुंबाचे महत्त्व सांगितले.
सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
म. ए. सो. बाल शिक्षण मंदिर डेक्कन जिमखाना पुणे 4.
नागपंचमी
श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. सर्व स्त्रिया व मुली या सणाची वाट पहात असतात. आपल्या शाळेत देखील हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी गुरुवार दिनांक 8/08/2024 रोजी शाळेमध्ये नागपंचमी हा सण साजरा केला गेला.
पहिली व दुसरीच्या मुलांनी क्ले मातीचे नागोबा करून आणले होते तर तिसरी व चौथीच्या मुलांनी वारुळाचे चित्र काढून ते छान रंगांमध्ये रंगविले होते. नागोबाच्या प्रतिमेची पूजा मा. मुख्या. सौ सुनिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर नागपंचमीची गाणी म्हणत मुलींनी त्यावर फेर धरले. झिम्मा, फुगडी यासारख्या खेळात मुलींबरोबर शिक्षिका देखील आनंदाने सहभागी झाल्या होत्या.
नागपंचमी हा सण साजरा करण्यामागचे महत्व शिक्षकांनी समजावून सांगितले. आपले जसे कुटुंब असते तसे नागाचे देखील कुटुंब असते, प्राण्यांचे देखील कुटुंब असते ही संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनात रुजावी त्यांच्या संगोपनातील महत्त्व त्यांना समजून यावे यासाठी शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांची घरे, कुटुंब यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. सुगरणीचे कुटुंब, घोड्याचे, हत्तीचे कुटुंब, गाईचे कुटुंब अशा वेगवेगळ्या प्राण्यांविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. आपले जसे कुटुंब असते तसे इतर सर्व प्राण्यांचे कुटुंब असते ही भावना त्यांच्यामध्ये रुजविण्यास यामुळे मदत झाली. सर्व मुलींनी आणि मुलांनी देखील या उत्सवात आनंदाने भाग घेतला होता. अशा रीतीने अतिशय उत्साहामध्ये नागपंचमी हा सण शाळेमध्ये साजरा झाला.
म.ए. सो. बाल शिक्षण मंदिर डे.जिमखाना,पुणे ४
गुरूपौर्णिमा
गुरूविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण न होई जगी सन्मान.
जीवन भवसागर तराया,
चला वंदु गुरूराया------ --
सोमवार दिनांक २२ जुलै २०२४ रोजी शाळेत गुरूपौर्णिमा आगळ्यावेगळ्या स्वरूपात साजरी करण्यात आली. आपल्या जीवनात गुरूला ईश्वराचे स्थान आहे.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माननीय मुख्याध्यापिका सौ.सुनिता चव्हाण यांच्या हस्ते दत्तगुरूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गुरू - शिष्यांच्या गोष्टीतून आपले विचार व्यक्त केले.
आपले प्रथम गुरू माता- पिता असतात. गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून शाळेत विद्यार्थ्यांनी मातृ-पितृ पूजन केले. याप्रसंगी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारावलेल्या वातावरणामुळे अनेक पालकांना आनंदाश्रू अनावर झाले. उत्तम संस्कार करणारा छान उपक्रम आहे, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. माननीय मुख्याध्यापिका सौ. सुनिता चव्हाण यांनी विद्यार्थी व पालक यांच्याशी संवाद साधला.
सर्व गुरूजनांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
अशाप्रकारे अतिशय उत्साहात गुरूपदी आदरभाव व्यक्त करणारा हा कार्यक्रम संपन्न झाला.
गोजिऱ्या पावलांच्या लयीत
टाळ मृदुंगाच्या साथीत
वारी प्रकटली बाल शिक्षण मंदिरात
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणाऱ्या आषाढी वारीच्या निमित्ताने म. ए .सो. बाल शिक्षण मंदिर शाळेत दिनांक 13/ 7 /2024 रोजी वृक्षदिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. सुनिता चव्हाण यांच्या हस्ते पूजन व आरती करण्यात आली.
शाळेच्या या वारीत शिक्षक, पालक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविधसंतांच्या वारकऱ्यांच्या पोषाखात शाळेचे छोटे विदयार्थी सामील झाले. विठ्ठल रखुमाईच्या साथीत छोटे वारकरी हाती टाळ, पताका, भाळी चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशी माळ, मुखी हरिनामाच्या गजर करीत होते. असे हे वारीचे विलोभनीय दृश्य पाहून सर्वांचे मन भक्ती रसाने न्हाऊन निघाले आणि नकळत दोन्ही हात जोडून वारीचे महत्व मनात साठवून ठेवले.
अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात 21 जून 2024 रोजी शाळेत 10 वा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला.. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अरुण अन्नछत्रे सर उपस्थित होते. यावेळी शाळेच्या मा.मुख्याध्यापिका सौ. सुनिता चव्हाण बाई यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. खेळाचे,व्यायामाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थीनी सूर्यनमस्कार योगासने, प्राणायाम यांचे सुंदर असे सादरीकरण केले.
शाळेचा पहिला दिवस
ही आवडते याप्रमाणे मन मनापासुनी शाळा याप्रमाणे सुट्टी संपून शाळेचा पहिला दिवस म्हणजेच15 जून 2024 मुलांच्या किलबिलाटाने सुरू झाला.या दिवशी शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ. सुनिता चव्हाण व इतर सर्व शिक्षक यांनी यांनी शाळेतील सर्व मुलांचे औक्षण करून स्वागत केले. वर्गा वर्गातून छोटे भाषिक बौद्धिक खेळ घेतले. मुलांना छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. बालगीते ऐकवली. अशाप्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात शाळेचा पहिला दिवस साजरा झाला.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा ।
सन 2023 24 या यावर्षी सादरीकरणासाठी कारक कृती कौशल्य हा विषय घेतला होता. निर्णय क्षमता, सहकार्य, एकाग्रता, वर्गीकरण, बौद्धिक कौशल्यांचा विकास होण्यासाठी कृती कौशल्यांची रचना करण्यात आली. कारक कौशल्यांवर आधारित उत्साहवर्धक आनंददायी आत्मविश्वास वाढवणाऱ्या वैविध्यपूर्ण कृतींची निवड करण्यात आली. यामुळे नवनवीन आव्हाने विद्यार्थी स्वीकारू लागले. विद्यार्थ्यांच्या कृतींमध्ये व हालचालींमध्ये सहजता व आत्मविश्वास दिसू लागला.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी शाळेत अनेक उपक्रम राबविले जातात. त्यातील एक उपक्रम म्हणजे क्षेत्रभेट. शाळेजवळील ठिकाणांना भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना नेले जाते. तेथील माहिती दिली जाते. यावर्षी अशाच विविध ठिकाणी क्षेत्रभेट केली.
पहिली, दुसरीच्या विदयार्थ्यांसाठी कमलानेहरु पार्क हे भेटीचे ठिकाण ठरविण्यात आले. पायी सहल असल्याने मुलांना रस्त्याच्या कडेकडेने चालावे, रस्ता कसा ओलांडावा, रस्त्याने चालताना शिस्तीने कसे चालावे याची ही माहिती दिली.
इ.3 री ची क्षेत्रभेट समर्थ सहकारी बॅंक सोलापुर, भांडारकर रोड येथे गेली होती.
बँकेतील व्यवहार कसे चालतात. अकाऊंट काढायचे म्हणजे काय करायचे, पैसे भरताना व काढताना कोणती स्लिप वापरायची, लॉकर म्हणजे काय, व्याज म्हणजे काय या सर्व बाबींची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली.
दिः २१/०१/२०२४ रोजी भीमा पाटस सहकारी साखर कारखाना व पायलट प्रशिक्षण केंद्र असणारे छोटेखानी विमानतळ या दोन्ही ठिकाणांना शाळेचे विद्यार्थी व शिक्षक यांनी भेट दिली.
क्षेत्रभेटीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाद्वारे परिसराचे ज्ञान मिळते. त्यांच्या व्यवहारज्ञानात भर पडते व त्यांच्या चौकस बुद्धीला चालना मिळते.
२७ फेब्रुवारी २०२४ दिवस उजाडला तोच एका दिमाखदार, नाविन्यपूर्ण, अभिनव सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा. सकाळी लवकरच मा. मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी, पालक उपस्थित होते. विदयार्थी पारंपारिक वेशात होते. फुलांनी सजलेली पालखी व पालखीत विराजमान असलेले दासबोध, भगवद्गीता असे ग्रंथराज सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. बालसाहित्य संमेलनाची सुरुवात साहित्य दिंडीने होणार होती. या दिंडीसाठी शाला समितीचे अध्यक्ष डॉ. विवेक कानडे, महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी' ही उपस्थित होते. या साहित्य दिंडीसाठी विशेष उपस्थिती होती ती गोवा राज्याचे शिक्षणाधिकारी श्री. नागेंद्र कोरे यांची. पारंपारिक वेशभूषेतील छोटे विद्यार्थी, विमलाबाई गरवारे प्रशालेचे ढोलपथक, बाल साहित्यिक, पालखी, शाळेतील विद्याथ्यांचे लेझीम पथक, टाळकरी विद्यार्थी, पालक अशा सर्वांचा सहभाग असणारी साहित्यदिंडी शाळेतून निघाली.
गोवा राज्याचे शिक्षणाधिकारी मा. नागेंद्र कोरे यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थी, पालक व प्रेक्षकांना मार्गदर्शन केले. यानंतर पुन्हा वाजत-गाजत दिंडी शाळेत आली. शाळेत आल्यावर मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली.
बाल साहित्याचे उदघाटन साहित्यिक मा. कर्नल शरदचंद्र पाटील (निवृत्त ) यांच्या हस्ते झाले. त्यांनीही या बालसाहित्य संमेलनाचे खूप कौतुक केले. बालगीते, समरगीत, पोवाडा, प्रश्न मंजुषा अशा विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात झाले. यानंतर दुपारच्या सत्रात ओवी, अभंग, संवाद, पुस्तक परीक्षण, बालगीते, भजने , बालकवी संमेलन, बहुभाषा सादरीकरण यांची मेजवानी उपस्थितांनी मिळाली. शाळेच्या आवारातच पुस्तक प्रदर्शन भरविले होते.
अशा अभिनव बालशिक्षण बालसाहित्य संमेलनाची' सांगता प्रसिद्ध साहित्यिक मा. राजीव तांबे यांच्या उपस्थितीत झाली. मा. राजीव तांबे यांनी मुलांशी दिलखुलासपणे संवाद साधला. त्यांच्या विनोदी शैलीत विज्ञानाचे छोटे-छोटे प्रयोग मुलांना सांगितले.
शाळेचे शालासमितीचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, प्रसिद्ध साहित्यिक मा. राजीव तांबे, शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सुनिता चहाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता झाली. या प्रसंगी इ. तिसरी आकाश वर्गातील विद्यार्थ्यांच्या स्वरचित कवितांच्या पुस्तकाचे प्रकाशन मा. राजीव तांबे यांच्या हस्ते करण्यात आले.
असे हे अभिनव, नाविन्यपूर्ण बालसाहित्य संमेलन सर्वांच्याच स्मरणात राहील हे नक्की.
22 ऑक्टोबर 2023 रोजी नवरात्रातील दुर्गाष्टमी. याच दिवशी म.ए.सो. बालशिक्षण या शाळेला १०१ वर्ष पूर्ण झाली. या दोन्ही मुहूर्ताचे औचित्य साधून या शाळेमध्ये १०१ बालिकांचे पूजन झाले.
नवरात्रामध्ये देवीचे पूजन करण्याबरोबर बालिकांच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. बालिकांना देवीचे प्रतिक मानून त्यांना विशेष सन्मान दिला जातो.
हे आध्यात्मिक जरी असले तरी याचा खरा अर्थ असा की, लहानपणापासूनच स्त्रीला तिचा यथोचित मान दिला जातो, तिचे समाजातील स्थान अधोरेखित केले जाते .हाच धागा पकडून म.ए.सो. बाल शिक्षण मंदिर शाळेने बालिकापूजनाचा स्तुत्य उपक्रम राबवला.
शाळेमध्ये सर्वप्रथम १०१ बालिकांचे पाय धुण्यात आले, हळदी कुंकु लावले. त्यांना वाण देण्यात आले .यानंतर काही विद्यार्थ्यांनी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले. यामध्ये शाळेचे माजी विद्यार्थीही सहभागी झाले होते. अशाप्रकारे आधुनिक जगामध्ये आपली संस्कृती जपण्याचा अभिनव उपक्रम राबवला गेला.
वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या आनंदाला व उत्साहाला उधाण ! दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्नेहसंमेलन आनंदाने पार पडले.
लहान मुले म्हणजे चैतन्याचा झराच असतात. नाचणे, बागडणे संगीताचा आनंद घेणे हा मुलांचा स्थायी स्वभाव आहे. यामध्येच एखादा कलाकार दडलेला असतो. आपल्या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे एक मध्यवर्ती कल्पना (थिम) घेऊन त्यावर आधारित रंजन कार्यक्रम सादर केले जातात.
सन २०२३-२०२४ या शैक्षणिक वर्षातील स्नेहसंमेलनासाठी पर्यावरण ही 'थीम' घेण्यात आली. विविध समित्या तयार झाल्या. मा. मुख्याध्यापिका सौ. चव्हाण बाई यांनी वेळोवेळी प्रत्येक समितीला मोलाचे मार्गदर्शन केले. २३ डिसेंबर २०२३ रोजी शाळेच्या मैदानावर स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहाने पार पडले. इयत्ता पहिली ते चौथी सर्व वर्गांचे एकत्रित स्नेहसंमेलन सादर झाले. स्नेहसंमेलनात उत्तरोत्तर कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. स्नेहसंमेलनाचा एक अविभाज्य भाग म्हणजे बक्षीस वितरण समारंभ. आपल्या पाल्याला मिळणारे बक्षीस पाहून पालकांचा उर अभिमानाने भरून येत होता. मा. प्रमुख पाहुणे डॉ. सुधीर उजळंबकर सर अध्यक्ष मा. डॉ. विवेक कानडे सर व शाळेचे महामात्र मा. डॉ. गोविंद कुलकर्णी सर यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
एक आनंदमय कलासोहळा म्हणजेच यंदाचे वार्षिक स्नेहसंमेलन. जे कायमचे विद्यार्थी व पालक व शिक्षकांच्या स्मृतीत राहील.
सण समारंभ
हातात हात घालून उभे
भारत देश साजरा
उत्सवांचा देश शोभे
विविध सणांमधून मुलांमध्ये विविध विषयांचे महत्त्व रुजविण्यात शाळेला नक्कीच यश मिळाले. आपल्या सणांबद्दलचा वेगळा दृष्टीकोन मुलांना समजणे गरजेचे आहे. फक्त पूर्वीपासून किंवा परंपरा म्हणून आपण काही गोष्टी करत आहोत त्या तशाच पुढे नेणे याच्यापेक्षा त्यामागील वैज्ञानिक दृष्टिकोन डोळसपणे विद्यार्थ्यांना समजला तर ते अगदी आनंदाने असे सण साजरे करतील आणि यातूनच आपली भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा नक्कीच टिकून राहील. हा विश्वास ठेवून आम्ही हे असे सण उत्सव साजरे केले. विद्यार्थी त्यात आनंदाने सहभागी झाले व त्यांच्यात अपेक्षित सकारात्मक बदल नक्कीच दिसून आला.