शाळेबद्दल

आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, लक्ष्मण नरहर इंदापूरकर आणि वामन प्रभाकर भावे अशा प्रतिभावंत व द्रष्टया समाजसुधारकांनी सन 1860 साली पुणे येथे म.ए.सो.ची स्थापना केली व नुकतीच वैभवशाली 160 वर्षे पूर्ण केलेली पुणे येथील ‘महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी’.

अशा उज्ज्वल परंपरा लाभलेल्या संस्थेची उज्ज्वल भवितव्य असणारी प्राथमिक शाळा म्हणजेच डेक्कन जिमखान्यावरील म.ए.सो बाल शिक्षण मंदिर!

पारतंञ्याच्या काळात विद्यार्थ्यांच्या मनात देशप्रेम निर्माण व्हावे म्हणून २२ ऑक्टोंबर १९२२ ” दिवाळीचा पाडवा” या दिवशी शाळेची डेक्कन जिमखान्यावरील भाजेकर पॅव्हेलियन मध्ये स्थापना झाली. बघताबघता विद्यार्थी संख्या वाढू लागली. डेक्कन जिमखाना हौसिंग सोसायटीने भांडारकर रोडवरील सध्याच्या इमारतीचे बांधकाम केले व नोव्हेंबर १९३८ पासून शाळा भांडारकर रोडवरील सध्याच्या इमारतीत आली. १९४५ ते १९५५ शाळेचे ‘दातार बंगला’ सध्याच्या प्रभात पोलिस चौकीच्या जागेवरील बोगदयाची शाळा तसेच ‘आयुर्वेद रसशाळा’ येथील जागेत स्थलांतर झाले. १९५५ पासून आजतागायत शाळा सध्याच्या इमारतीत भरत आहे.

१९४० सालापासून शाळेत शिष्यवॄत्ती मार्गदर्शन वर्ग सुरू झाले.तेव्हा पासून आज सन २०१४-१५ पर्यंत २४० विद्यार्थ्यांनी ‘पूर्व माध्यमिक शिष्यवॄत्ती’ प्राप्त केली आहे. शाळेतील गणेशोत्सवाची १९४० सालापासून सुरूवात झाली. दरवर्षी मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित शाळेचे स्नेह संम्मेलन उत्साहाने साजरे होते. निरनिराळे सण उत्सव, थोर महापुरूषांची जयंती व पुण्यतिथी, सूर्यनमस्कार,वार्षिक सादरीकरण व नवोपक्रम या सारखे उपक्रम केले जातात. शाळेचे ” बालरवी” हे हस्तलिखित व “मधुकण” हे नियतकालिक विद्यार्थी शिक्षकांच्या मदतीने तयार होते. शाला बाहय स्पर्धांमध्ये विद्यार्थी यश मिळवतात.क्रिडा स्पर्धेतही यश संपादन करतात. अशा शाळेचे साहित्य, कला, क्रीडा, संशोधन, उदयोग, संरक्षण इ. क्षेत्रात अनेक माजी विद्यार्थी उच्चपद भूषवित आहेत.

असा समॄध्द परंपरेचा वारसा लाभलेली शाळा शतकाकडे वाटचाल करीत आहे.शाळेचा ज्ञानवॄक्ष सदोदीत बहरत राहो हीच सदिच्छा !

Scroll to Top