मुख्याध्यापिका संदेश

 

नित्य नव्या कल्पना अन् उंचच उंच भराऱ्या,

 घेऊन झेप क्षितिजावरी घालण्या गगना  गवसणी,        

देत असे बालपंखी बळ अशी ही शाळा बाल शिक्षण,

 वसे विद्यार्थी हृदयी सदा त्यांची ही बाल शिक्षण शाळा |

 

सस्नेह नमस्कार ! म.ए.सो.बाल शिक्षण मंदिर शाळेच्या वेबसाईटवर आपले मनःपूर्वक स्वागत आहे.

 परंपरागत शिक्षण हे अधिक कौशल्यपूर्ण ज्ञानपूर्ण व्हावे म्हणून नवनवीन शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी कार्यरत असणारी ही मराठी माध्यमाची शाळा असून शाळेत इ. पहिलीपासून सर्व विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीचे शिक्षण दिले जाते. इ. पहिली ते इ. चौथीपर्यंत एकूण १६ वर्ग शाळेत आहेत. सरासरी ५०० इतकी विद्यार्थी संख्या असणाऱ्या या दगडी इमारतीच्या टुमदार शाळेत विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्गात ई लर्निंग सुविधा निर्माण केलेली असून शाळेत स्वतंत्र संगणकशिक्षण वर्ग ही चालविला जातो. बदलत्या काळानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाप्रमाणे शाळेने अध्ययन अध्यापन प्रक्रियेत नवनवीन कौशल्यांचा समावेश, क्रीडा कौशल्य विकसनासाठी सुसज्ज अशा भव्य मैदानाचा दैनंदिन वापर, इलेक्ट्रॉनिक्स साधने, नूतन तंत्रपद्धतीअनुभवाधिष्ठित शिक्षण पद्धती यांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक आनंददायी, कृतीप्रधान आणि सचेतन झाले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि शाळेचा दर्जा वाढविण्यासाठी शाळेत दरवर्षी नवीन संकल्प,वर्षभर चालणारे शैक्षणिक प्रकल्प हाती घेतले जातात. आपल्या या मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकलेले अनेक विद्यार्थी पुढे उत्कृष्ट अभियंते, प्रसिद्ध वैज्ञानिक, यशस्वी उद्योजक, कारखानदार, वैद्यकीय तज्ञ, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू म्हणून लौकिकास प्राप्त झाले आहेत. प्रशासकीय नोकरी, व्यापारी क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, संशोधन क्षेत्र अशा सर्वच क्षेत्रांमध्ये शाळेचे विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत. हे बाल शिक्षण शाळेच्या यशाचे द्योतक आहे. अशा या उपक्रमशील शाळेविषयी अधिक माहिती या वेबसाईट द्वारे जाणून घेऊयात, धन्यवाद !🙏🏻🙏🏻

मुख्याध्यापिका

सौ. सुनिता विलास चव्हाण

Scroll to Top